



यावल, प्रतिनिधी | येथील बसस्थानकावर आज (दि. ७) दुपारी एका मागे एक अशा तीन मंगळसूत्र चोरीस गेल्याच्या घटना घडल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. अडीच तासाच्या आत झालेल्या चोरी प्रकारामुळे प्रवासी महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, येथील बसस्थानकात आज दुपारी १२.३o च्या सुमारास बुऱ्हाणपूर- शिर्डी या बसमध्ये प्रवास करण्यासाठी चढणाऱ्या दोन महिलाची सोन्याची मंगळसूत्रे अज्ञात महिला चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्यानंतर दोन तासाच्या अंतराने रावेर-धुळे बसमध्ये चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना चोपडा येथे राहणाऱ्या व चोपडा एसटी आगारात तांत्रीक शाखेत कर्मचारी रवींद्र कोळी यांच्या पत्नी सौ .संगीता ह्या भुसावळ येथील चुलत भावाच्या अंत्यविधीसाठी गेल्या असता परतीच्या वेळी नातेवाईकासह यावल बस स्थानकावर दुपारी ३.०० वाजता आल्या. या वेळी चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याचे आढळून आले, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


