यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे व वाघळुद शिवारातील तापी नदीच्या काठी बेकायदेशीर सुरू असलेल्या दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या यावल पोलीसांनी उद्धवस्त केल्या. या कारवाईमुळे अवैध धंद करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाघळूद शिवारातील तापी नदीच्या काठी बेकायदेशीर दोन गावठी दारू हातभट्टी सुरू असल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांना मिळाली. त्यानुसार आज पहाटे साडेपाच वाजता वाघळूद शिवारातील तापीनदीकाठी एका ठिकाणी दोन दारूच्या भट्ट्या सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी पोलीसांना पाहून संशयित आरोपी राजू भागवत सपकाळे, तेजस राजू सपकाळे दोघे रा. अंजाळे आणि धर्मा भिल रा. वाघळून असे तिघांना दारू भट्टी सोडून पळ काढला. यावेळी पोलीसांनी केलेल्या कारवाईत ८०० लिटर कच्चे पक्के रसायन आणि २५ लीटर तयार दारून हस्तगत केली. तर रसायन जागीच नष्ट केले. याप्रकरणी यावल पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे.