यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

यावल, प्रतिनिधी । येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग व आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषवले.

 

कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. एम .डी. खैरनार यांनी विचार व्यक्त केले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करताना कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी विरोध दर्शविला नाही. सर्वांनी एक मताने निरक्षर असूनही काव्य प्रांतात अनमोल कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या जातिवंत शेतकरी असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. प्रा. प्रवीण पाटील यांनी बहिणाबाईंच्या काव्यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रतिपादन केले की, बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेत जीवन संदेश आहे. त्या दैववादी नसून कर्मवादी होत्या. त्यांच्या कवितेतून निसर्ग, मानव समाज, कृषी क्षेत्र व सण उत्सव यांचे उत्कट चित्रण येते. विशेष म्हणजे त्यांच्या कविता बोलीभाषेमध्ये असून लयबद्ध आहेत.  अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील चिंतनशीलता, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावमयता,  आशय घनता ही साहित्यिक वैशिष्ट्ये स्पष्ट केली.   प्रास्ताविक  प्रा. एस. आर .गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. आभार डॉ. एस. पी . कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा .संजय पाटील, डॉ. पी. व्ही पावरा, डॉ. एच. जी .भंगाळे, मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content