यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज!

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

देशात कोरोनाचं संकट गडद होत असताना देशातला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.  निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून   दिलासादायक माहिती देण्यात आली आहे.  यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

 

केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानलं जातं. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असं मानलं जातं. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानलं जातं. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतीवृष्टी मानली जाते.

Protected Content