मोहाडी येथील तरूणाला मारहाण करून रोकड लांबविणाऱ्या तिघांना अटक; शहर पोलीसांची कामगिरी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील तरूणाला लाकडी दांडक्यासह लोखंडी पट्टीने मारहाण करन त्याच्या खिशातील पाच हजार रुपये रोख व मोबाईल लांबविल्याची घटना १ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्ह्यात फरार असलेल्या तिघांना शहर पोलीसांनी अटक केली आहे.

शिवा देवीदास बाविस्कर, ज्ञानेश्‍वर देवीदास बाविस्कर व कुंदन देवीदास बाविस्कर तीन्ही रा. नागझिरी ता. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

घटना अशी की, महेंद्र पितांबर ठाकरे वय ४० रा. मोहाडी हे रिक्षाचालक आहेत. १ डिसेंबर रोजी ठाकरे हे रिक्षा घेवून जळगाव शहरातील जुने बसस्थानकाजवळ आले. याठिकाणी त्यांन शिवा बाविस्कर भेटला. ठाकरे व बाविस्कर दोघांनी सोबत मद्यप्राशन केले. यावेळी बाविस्कर याने ठाकरे यांच्यासमोर त्याची बहिण मीना कोळी यांना शिवीगाळ केली. यानंतर ठाकरे यांनी शिवा बाविस्कर याच्या कानशिलात लगावली. त्याचा राग येवून शिवा हा त्याचे भाऊ ज्ञानेश्‍वर व कुंदन यांना घेवून आला. ज्ञानेश्‍वरसह कुंदन व शिवा या तिघा भावंडांनी लाकडी दंडुका तसेच लोखंडी पट्टीने महेंद्र ठाकरे यांना मारहाण केली. मारहाणीत ठाकरे हे बेशुध्द पडले. याचवेळी ठाकरे यांच्या खिशातील पाच हजार रुपये व मोबाईल लांबवून तिघांनी पळ काढला होता. यानंतर एका रिक्षाचालकाने ठाकरे यांना देवकर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. याप्रकरणी ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताबाबत शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरिक्षक भिमराव नंदुरकर, गुन्हे शोध विभागातील तेजस मराठे,  विजय कोळी, बापू मोरे, योगेश इंधाटे, योगेश सपकाळे यांच्या पथकाने ज्ञानेश्‍वर बाविस्कर, कुंदन बाविस्कर आणि शिवा बाविस्कर या तिघांना अमळनेर तालुक्यातील नागझिरी गावातून अटक केली.

Protected Content