मेघालयात १५०० किलोहून अधिक स्फोटके जप्त

 

 

 

शिलाँग : वृत्तसंस्था । मेघालयाच्या ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. सोबतच पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

, एका गाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची गुप्त सूचना पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर बुधवारी रात्री या भागात पोलिसांनी
सर्च ऑपरेशन हाती घेतलं.

या दरम्यान लाडरिमबाई पोलीस चौकी भागातील कोंगोंगमध्ये एक संशयित गाडीला पोलिसांकडून रोखण्यात आलं.

आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेल्या या गाडीत धोक्याची घंटा पोलिसांना जाणवली. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक जी के इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधून दहा पेट्या आढळल्या. या पेट्या २५० किलो स्फोटकांनी भरलेल्या होत्या. यामध्ये २५०० जिलेटीन कांड्याचाही समावेश होता. तसंच १००० डेटोनेटर जप्त करण्यात आले.

पोलिसांनी ही गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांनाही तत्काळ अटकेत घेतलं. आरोपींच्या चौकशीत आणखी काही आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खलीहरियाट भागातून आणखी चौघांना अटक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी घातलेल्या छाप्यात जवळपास १२७५ किलो स्फोटके (१० हजार २०० जिलेटिन कांड्यांसहीत) ५००० डेटोनेटर जप्त करण्यात आले.

इंगराई यांच्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण दीड हजारांपेक्षाही जास्त (१५२५ किलो) स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विस्फोटक कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content