खुनाच्या गुन्हात फरार असलेला गुन्हेगार जेरबंद

barela

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील जीनच्या मागे मध्यप्रदेशातील मजुराचा पैश्यावरून आरोपींचे भांडण होवून हाणामारी झाली होती. यात मजुराचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील असलेला फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रकाश रतन बारेला रा. लेंगडी ता. सेंधवा (म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव येथील चैताली कॉटन जिनच्या मागे पत्र्याच्या घरात बोंदरसिंग डकला बारेला (वय 35) रा. रामगढी मध्यप्रदेश याला मजुरीचे पैसे वाटपाच्या कारणावरून भांडण करून आरोपी प्रकाश रतन बारेला यांने लाकडी काठीने मारहाण केली होती. यात बोंदरसिंग जबर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात धरणगाव पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार झाला होता.

आरोपी प्रकाश बारेला धुळे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रोहम यांनी पथक तयार करून मालेगाव ते शिरपूर व साक्री पर्यंत सर्व हॉटेल व बारमध्ये तपास केल्यानंतर पोराळा तालुक्यातील बहादरपूर येथे शेत मजुरी काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथेही चौकशी केली मात्र तेथेही मिळाला नाही. गावातच अधिक विचारपूस केली असता तो चोपडा तालुक्यातील पांढरी येथे असल्याची खात्री झाल्याने शिताफीने अटक केली. पुढील तपासासाठी धरणगाव पोलीसांच्या आरोपी प्रकाश बारेला याला ताब्यात देण्यात आले. या कारवाईसाठी सपोनि सागर शिंपी, पोहकॉ नारायण पाटील, बापु पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रविण हिवराळे यांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content