मूल्यसंस्कार करणारी माया धुप्पड यांची कविता दिपस्तंभासमान – महापौर जयश्री महाजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “विद्यार्थ्यांच्या पिढ्यांवर मूल्यसंस्कार करून ज्ञानभांडार वाढविणारी माया धुप्पड यांची कविता दिपस्तंभासमान आहे” असे प्रतिपादन जळगाव महानगर पालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित ‘अनमोल भेट – बालकविता संग्रहांची’ या अभियानांतर्गत सुप्रसिद्ध कवयित्री , गीतकार आणि बालसाहित्यिका माया दिलीप धुप्पड स्वलिखित बालसहित्याचा नजराणा घेऊन ‘विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या अभिनव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

मेहरूण येथील राज प्राथमिक – माध्यमिक विद्यालयातील डॉ.सुनील महाजन सभागृहात आज बुधवार, दि. १० ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात कवयित्री माया धुप्पड, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, कार्यक्रमाचे आयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे, सरोज पाटील, विकास नेहेते आदींची उपस्थिती होती.

भारतमाता, आधुनिक सरस्वती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर माया धुप्पड यांचा विजय लुल्हे यांनी सत्कार करत त्यांच्या कार्याचा परिचय करून देत साहित्य लेखनाचा प्रवास सांगितला.

कवयित्री माया धुप्पड यांनी बाबा आणि आई ‘, ‘ जोडणारा धागा ‘, ‘ थंडी या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.भांडण ‘, ‘ रंग या कवितांचे विद्यार्थ्यांकडून अनुगायन करून घेतेले.चल गं सई शाळेला जाऊ ‘, ‘ गर गर घागर ,’ ‘ अटक मटक हे बालगीत गातांना विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा उत्स्फुर्त ठेका धरला. आशय संपन्न कविता व मधाळ शब्दातील विश्लेषणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाल्याने कार्यक्रम संस्मरणीय झाला. मिनाक्षी मिस्तरी व सुजाता जगदेव या चिमुरड्यांनी इंग्रजीतून आशयसंपन्न कविता सुरतालात सादर करून टाळ्या मिळविल्या.

अनमोल भेट – बालकविता संग्रहांची –

माया धुप्पड यांनी स्वलिखित पुरस्कृत कवितासंग्रहांसहित एकूण दर्जेदार १७ बालकविता संग्रहांची अनमोल भेट दिली. सोबत ” तू करुणेचा सिंधू ” ही सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, देवकी पंडित, मंदार आपटे यांनी स्वरबद्ध केलेल्या दत्त भक्तिगीतांची ध्वनिफित शालेय ग्रंथालयासाठी महापौर जयश्री महाजन यांना सुपूर्द केली. भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वलिखित देशभक्तीपर गीताचे शाळेसाठी ८ x ४ फुटाचे भव्य पोस्टर फ्लेक्सची सुद्धा समयोचित भेट दिली.

       

द्वितीय सत्रात माया धुप्पड यांच्या कवितांवर आधारीत भव्य ” मनमोर ” चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाचे कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी अमृत नेहेते,राकेश महाजन व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.धुप्पड मॅडम यांची भेट संस्मरणीय व्हावी म्हणून त्यांच्या शुभहस्ते विजय लुल्हे यांच्या उपस्थितीत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल नेहेते यांनी तर आभार प्रदर्शन सुशील सुरवाडे यांनी केले.

Protected Content