मुसळधार पावसाने दरड कोसळली; ७२ जण बेपत्ता

महाड | महाड तालुक्यातील बीरवाडीजवळ मुसळधार पावसाने दरड कोसळल्यामुळे ३० घरांमधील ७२ लोक दाबले गेल्याची भिती व्यक्त होत आहे.

कोकणच्या किनारपट्टीला तुफानी पावसाचा तडाखा पडल्याने अनेक ठिकाणी प्रचंड पूर आल्याचे दिसून येत आहे. यात चिपळूण शहरात सर्वात भयंकर स्थिती आहे. तर आता इतर ठिकाणी देखील अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. यातच रायगडमधील महाड तालुक्यातील तलीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील जवळपास ३० घरांवर दरड कोसळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७२ रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्यानं अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही. मात्र यात मोठी जीवीत हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चिपळूणमध्ये पाऊस सुरूच असल्याने येथील स्थिती बिघडली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे. यातच आता दरड कोसळल्याच्या घटनेने प्रशासनाची चिंता वाढविली आहे.

Protected Content