आ. मंगेश चव्हाण यांची आत्महत्याग्रस्त तरूणाच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

चाळीसगाव प्रतिनिधी | एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या युवकाच्या कुटुंबाला आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले तीन महिन्यांचे पाच लाख रूपयांचे वेतन मदत म्हणून देऊन सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.

आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या तरूणाच्या कुटुंबावर असणारे कर्ज भाजपने भरण्याची घोषणा केली आहे. हे कर्ज १९.९५ लाख रूपयांचे होते. यातील पाच लाख रूपये आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत. एक ग्रामीण भागातील व परिस्थितीचे चटके सोसलेला तरुण आमदार या नात्याने सामाजिक दायित्व म्हणून मीदेखील माझ्या ३ महिन्यांच्या मानधनातून ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

या माध्यमातून राज्यातील हजारो स्वप्नील यांना संदेश द्यायचा आहे की, आत्महत्यासारखे टोकाचे पाउल हा काही पर्याय नाही होऊ शकत, आपल्यामागे कुटुंबियांची होणारी अवस्था, समाजात जाणारा संदेश हे सर्व चित्र खूप विदारक असत. संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, सर्व पक्ष, आमदार – खासदार एमसीएसच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, माझी सर्वाना विनंती आहे की, काही अडचण असल्यास आम्हाला सांगा मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

मुंबईत आमदार चव्हाण यांनी मदतीचा धनादेश प्रदान केला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. प्रवीण दरेकर, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर, चाळीसगाव पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Protected Content