पुण्यात मनसेची सभा ; मैदानात चिखलाचे साम्राज्य

Pune Raj Thackeray Sabha

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभामागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेली मनसे आजपासून प्रचारांचा धडाका सुरु करणार आहे. पुण्यातील सरस्वती विद्यालयाच्या मैदानात मनसेच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला मैदान मिळण्यात अडचण येत होत्या. मात्र मिळालेल्या मैदानात पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

रात्रभर झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. चिखल साचल्यामुळे श्रोत्यांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. मैदानातील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नातू बागेतील या मैदानात कर्मचाऱ्यांसह मनसेचे पदाधिकारीही पाणी उपसण्याच्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना, भाजप यांनी प्रचारांचा धडाका सुरु केला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या सभेचा श्रीगणेशा करण्यासाठी पुण्यात मैदान मिळताना अडचण येत होती. पहिल्या सभेसाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला आहे. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो. त्यामुळे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नऊ तारखेचा मुहूर्त मनसे निश्चितच चुकवणार नाही.

Protected Content