पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे ) । संतोषीमातानगर पहूरपेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध ते व्हॉट्सअप मॅसेजद्वारे जनजागृती करत आहेत. यात त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आदींची माहिती दिली आहे.
मुख्याध्यापक पी. पी. पाटील यांनी वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता, शौचालय स्वच्छता, परिसर स्वच्छता, अन्नाची स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व या बाबतीत व्हॉट्सअपद्वारे जनजागृती करत आहे. त्यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युज प्रतिनिधी रविंद्र लाठे यांच्याशी बोलतांना सांगितले की, आजची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनीच स्वच्छते विषयी काळजी घेतली तर कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. जेथे घाण-दुर्गंधी, अस्वच्छता असते तेथेच रोगराई पसरते. रोगराई होवू नये म्हणून स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे. जेथे स्वच्छता असते तेथील आरोग्य नेहमी चांगले असते. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य निरोगी व शरीर सुदृढ राहते.
मुख्याध्यापक पाटील यांनी विविध विषयांवर तयार केलेले व्हाट्सअप मॅसेज पुढील प्रमाणे :-
वैयक्तिक स्वच्छता : हाता-पायांची नखे नियमीत काढावी. दररोज दात स्वच्छ घासावेत व स्नान करावे. बाहेरून आल्यावर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
घराची स्वच्छता:- घरातील केरकचरा रोज काढावा. घरातील फरशी झाडून-पुसून स्वच्छ ठेवावी. घरात जर स्वच्छता असेल तर मन प्रसन्न राहते.
शाळेची स्वच्छता:- वर्ग नेहमी स्वच्छ ठेवावा. शाळेचे क्रिडांगणही स्वच्छ ठेवावे. शाळेच्या परिसरात झाडे लावावीत. शाळेच्या परिसरातील झाडांचे व फुलांचे जतन करावे.
कपड्यांची स्वच्छता : कपडे नेहमी स्वच्छ धुवून वाळवावेत. कपडे धुण्यासाठी नेहमी साबण, डिटर्जंट, ब्रश, इत्यादी चा वापर करावा. धुतलेले कपडे व्यवस्थित घडी करून ठेवावेत.
शौचालय स्वच्छता:- शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये. आपले शौचालय नेहमी स्वच्छ ठेवावे. पाण्याचा पुरेसा वापर करावा. शाळेमध्ये नेहमी स्वच्छतागृहाचा वापर करावा. उघड्यावर शौचालयाची बसू नये. त्यासाठी शौचालयाची वापर करावा. स्वच्छतेचे पालन केल्याने रोग टाळता येवू शकतात.
परिसर स्वच्छता:- आपले अंगण नेहमी स्वच्छ ठेवावे. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. कचरा पडू नये यासाठी विहिरीवर जाळी बसवावी. नदी-नाले स्वच्छ ठेवावे.
अन्नाची स्वच्छता:-नेहमी घरचे ताजे अन्न खावे. रस्त्यावरील उघडे पदार्थ खाऊ नये. अन्न व फळे उघडी ठेवू नये. त्यावर जाळीदार झाकण असावे.
पाण्याची स्वच्छता:- पाणी घेण्यासाठी नेहमी तोटी किंवा ओगराळ्याचा वापर करावा. पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून व तुरटी फिरवून घ्यावे. गावातील नदी प्रवाहाच्या सुरूवातीला पाणी भरावे. खालच्या प्रवाहात धुणी-भांडी करावीत. स्वच्छतेचे महत्त्व:- सुका कचरा व ओला कचरा नेहमी वेगवेगळा टाकावा.