मुंबई : वृत्तसंस्था । राम मंदिराच्या नावावर भाजप वर्गणी घेत श्रेय लाटत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला. त्यांनी बाबरी विध्वसाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या जबाबदारीबाबतही आवर्जुन सांगितलं. त्यावरुन आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील वक्तव्यावरुन एक ट्वीट केलं आहे. त्यात “महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बाबरी मस्जिदच्या विध्वंसाचा उदोउदो केला आणि तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग आहे? ओवेसी यांनी लावलेल्या विषारी रोपट्याच्या वाढीसाठी यात पुरेसं खतपाणी नाही का?”, असा सवाल निरुपम यांनी केलाय. ते विषारी रोपटे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे वाढेल अशी भीती या प्रश्नातून त्यांनी व्यक्त केली
बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी विध्वंसाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही वेळोवेळी आठवण काढली. त्याबद्दल तुमचे आभार की तुम्ही अजून त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब ज्या आक्रमकतेनं उभं राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर येडे गबाळे पळून गेले होते. बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. म्हणजे आता विषय असा झाला आहे की, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही. बाबरी आम्ही पाडलेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कुणी तर आम्ही नाही पाडली. सहा वर्षे केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिरासाठी कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला तर सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसै मागत आहे. पैसे कुणी दिले तर जनतेने दिले. पण आमचं नाव आलं पाहिजे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता.
मुख्यमंत्री सभागृहात भाषण करताना आणि बाबरी विध्वंसाबाबत बोलत असताना सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही मंत्री, आमदार उपस्थित होते. हे मंत्री आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला बाकं वाजवून दादही देत होते. याच मुद्द्यावरुन आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तयार करण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिली आहे.