मुख्यमंत्रीपदाची मागणी ओबीसींची तशीच दलितांचीही, पण उद्धव ठाकरेंमुळे होणार नाही – आठवले

पुणे : वृत्तसंस्था । मुख्यमंत्रीपदाची मागणी जशी ओबीसींची आहे, तशीच ती दलितांचीही आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

राज्यात आता अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत, असंच काहीसं चित्र दिसू लागलं आहे. कारण ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी समाजाचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी आता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे बॅनर झळकावले आणि घोषणाही दिल्या.

दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी जशी ओबीसींची आहे, तशीच ती दलितांचीही आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

ओबीसी समाजाची मुख्यमंत्री होण्याची मागणी आहे. तशीच मागणी दलित समाजाचीही आहे. पण मी काही मुख्यमंत्री होणार नाही. मला माहिती आहे की मी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही. पण मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी लोकसभेत मत मांडलं आहे. जनगणनेमुळे जातीवाद होईल असं नाही. तर प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थगिती दिल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन थांबायला हवं होतं. बाजार समित्या बंद करण्याची भूमिका सरकारची नाही. कायदा मागे घेणं योग्य नाही. दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणं चुकीचं आहे, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आता शरद पवार यांनी कृषी कायद्याचा अभ्यास करावा. पवारांनी कायद्यात बदल सुचवायला हवा, असंही आठवले यांनी म्हटलंय.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. बाळासाहेबांचा हा पुतळा पाहून तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगत आहेत की, त्यांनी चुकीचा निर्णय़ घेतला,’ असा टोला आठवले यांनी लगावला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत परत जायला हवं असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

महाविकास आघाडीचं सरकारचं भविष्य आपल्याला दिसत नाही. एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल किंवा दोन्ही पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील, असं भाकीतही आठवले यांनी करुन टाकलं.

Protected Content