रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कंटेनर-जीप अपघातात दोन जण ठार

सोलापूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ ट्रेलर व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास आंधळगावजवळ घडला. या अपघाताची फिर्याद चौडाप्पा कुंभार (रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

फिर्याद चौडाप्पा कुंभार यांची नातेवाइक संगीत कुंभार यांना कराड येथून घेऊन जीप अक्कलकोटकडे निघाली होती. आंधळगावजवळ रस्त्यालगत पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला कंटेनर (जीजे १८/पीटी ८७८२) थांबला होता. त्याला मागून आलेल्या जीपने (केए २७/बी ६१८८) जोराचे धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले. ही जीप कर्नाटक राज्यातील आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा समोरचा भाग कंटेनरच्या खाली घुसला होता. शेवटी जेसीबी बोलावून जीपला ओढून जखमी चालक आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव जांगळे व चालक सूरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली. दरम्यान, कंटेनर चालक इंद्रजितकुमार कृष्णा सिंग (मझौली बिघा, ता. बाढ, जि. पटना, बिहार) याचे रस्त्याच्या बाजूला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रिफ्लेक्टर न लावता वाहन लावल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम धापटे तपास करत आहेत.

नागपूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव परिसरामध्ये अद्ययावत रुग्णवाहिका तैनात करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आरोग्य विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या भागात अपघात झाल्यास सांगोला किंवा दूरवरच्या रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागते. परिणामी अपघातातील जखमीला जीवितास मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Protected Content