यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे, कठोरा, कासवे, दुसखेडा परिसरातील सुमारे २०० एकर ऊसाची तोड मुक्ताईनगर साखर कारखान्याकडून होत नसल्याने तसेच ५०% टक्के ऊस कोरडा खट्ट झाल्याने परिसरातील ऊसाची लागवड करणारा शेतकरी हा हवालदिल झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात गाळप क्षमता व साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या अव्वल क्रमांकाचा मधुकर सहकारी साखर कारखाना हा राजकारणाला बळी ठरला हे वस्तूस्थिती आहे. या सर्व कारखानदारी चालविण्याच्या चुकलेल्या गणीताच्या गोंधळलेल्या कारभाराविषयी तालुक्यातील परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कारखानदारीच्या स्थानिक नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील न्हावी ( फैजपुर )मार्गावरील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने या आधीपण यावल तालुक्यातील बराच शेतकऱ्यांचा ऊस मुक्ताईनगर साखर कारखान्याकडे नेला जात होता आणि आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी मुक्ताईनगर येथील मुक्ताई सहकारी साखर कारखाना येथे नोंदणी केला आहे. असे असुन देखील एप्रिल महिन्याची दहा तारीख आल्यावर सुद्धा मुक्ताई सहकारी साखर कारखान्याकडून उसाची तोडणी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मुक्ताईनगरची वारी केली परंतु पदरी निराशा येत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस लागवड करा म्हणून मुक्ताई साखर कारखान्याचे कर्मचारी व पदाधिकारी गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याची विनंती करतात. आता मात्र ऊस तोडणीसाठी कोणी फिरकून सुद्धा शेतकऱ्यांकडे बघत नाही. प्रचंड उन्हात शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून कष्ट करून ऊस उत्पादनासाठी घेतलेली मेहनत वाया जाणार की काय या काळजीने शेतकरी व त्याचा परिवार कासावीस होत आहे. आतातरी मुक्ताईनगर साखर कारखाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब उसाची तोडणी करावी अशी मागणी पाडळसे, बामणोद परिसरातील उस उत्पादक शेतकरी बांधव करीत आहे.