विरवाडे येथील जि.प. प्राथमिक शाळेत ‘दप्तरालय’चा अभिनव उपक्रम

c0664395 4852 4127 9570 1f33c9e665c6

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील विरवाडे येथील जि.प. प्राथमिक डिजिटल मॉडेल शाळेने मुलांना दप्तराचे ओझेच होऊ नये, यासाठी ‘दप्तरालय’ हा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यात अशा पध्दतीने उपक्रम राबवणारी ही पहिलीच शाळा आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दप्तरे शाळेतच ठेवण्याची सोय व्यवस्थापनाने केली आहे.

 

अधिक माहिती अशी की, विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे होऊ नये, पावसाळ्यात पुस्तके भिजू नयेत, यासाठी शाळेत वर्गनिहाय लोखंडी रॅक बनवण्यात येवून त्यात विद्यार्थीनिहाय खाते बनवले आहेत. त्या खात्यांवर प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव व क्रमांक टाकले आहेत. प्रत्येक शाळेत शिक्षकांना शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर असतात परंतु विदयार्थ्यांनाही त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी काहीतरी हवे, यातूनच दप्तरालय या संकल्पनेचा उदय झाला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी सौ. भावनाताई भोसले व केंद्रप्रमुख सौ. मिनाक्षीताई गाजरे यांनी विशेष कौतुक केले आहे.

दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावे, असा संकेत आहे. सर्व विषयांची पुस्तके, तेवढयाच वह्या, चित्रकला, संगणक, प्रयोगवही,वर्कबुक, फॅन्सी वॉटर बॉटल, मोठा टिफीन , कंपास बॉक्स, डिक्शनरी , रायटिंग पॅड एवढे सगळे दप्तरात भरल्यावर नक्कीच वजन चार ते पाच किलोपेक्षा जास्त होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे.

‘दप्तरालय’सारखा उपक्रम राबवण्यासाठी शाळेला रावेर येथील प्रशांत कासार यांनी सामाजिक जाणिवेतून आणि त्यांच्या मातोश्री स्व.सौ. शोभाताई कासार (शेटे) यांच्या स्मरणार्थ भरीव देणगी दिली आहे. त्यातून ‘विनादप्तराची शाळा’ हा अत्यंत आनंददायी उपक्रम आकाराला आलाय. मुलांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पाण्याच्या बाटलीचे वजन कमी करण्यासाठी शाळेत शुद्ध पाण्याची यंत्रणाही लावण्यात आलीय. विद्यार्थी आता स्वाध्यायानुसार पुस्तक व वही तेवढे घरी नेतात, यामुळे दप्तराच्या ओझ्याचा अहवाल देताना वजन शून्यावर आले आहे. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्न केले व निर्णय घेतले तरीही त्याला पूर्ण यश आले असे म्हणता येत नाही. मात्र सरकारी आदेशापलीकडे जाऊन विरवाडे येथील शाळेने हा उपक्रम राबवल्याने तो इतरांसाठीही अनुकरणीय आहे.

Protected Content