मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी केंद्रांवर होणाऱ्या गर्दीवरुन त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आलं आहे. यामुळे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
“अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. आपल्याकडे अत्यंत अल्प साठा आहे. १ लाख ७६ हजार लस येत असल्याचं मला माध्यमांकडून कळालं आहे. पण तेदेखील अपुरं पडणार आहे. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांचीच इतकी मोठी रांग आहे. बीकेसीमध्ये केंद्राबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. रुग्ण वाढत असताना लस घेऊन सुरक्षित राहावं अशी लोकांची भावना आहे. गर्दीचं रुपांतर मोठं होतं असून त्यात लस घेण्यासाठी आलेले कोणी बाधित तर होत नाही ना अशी भीती आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन करताना त्याचा कंटाळा आला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. आपल्याला लोकांना वाचवायचं आहे. मग ते देशातील, राज्यातील मुंबईतील कुठलेही असो असं आवाहन करताना लोकसंख्येप्रमाणे लसींचं वाटप झालं पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. लसीचा साठा किती आहे याची माहिती केंद्राबाहेर बोर्डावर लावण्यात येणार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी गंभीर आणि सक्रीय आहेत. पण त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्याच गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचं दिसत आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.