उद्धव ठाकरे हिंदुत्वाशी तडजोड करणार नाहीत, ही अपेक्षा – सावरकर

ranjit savarkar

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या होऊ घातलेल्या ‘महाआघाडी’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच हिंदुत्वाशी तडजोड करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याच्या मागणीवरून ठाकरे मागे हटणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सत्तापेच कायम असताना व भाजपला सत्ताबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या नव्याने आकाराला येत असलेल्या महाआघाडीवर सावरकर यांचे नातू रणजीत यांनी टिप्पणी केली आहे. शिवसेना हिंदुत्वबाबत काँग्रेसची भूमिका बदलण्यात यशस्वी ठरतील अशी मला अपेक्षा आहे, असेही सावरकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुतीकडून या पक्षांनी सत्तेत आल्यास वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते.

महाशिव आघाडीच्या प्रयत्नांना आव्हान
तत्पूर्वी, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या नव्याने आकाराला येत असलेल्या आघाडीविरोधात हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. प्रमोद पंडित जोशी यांनी आज सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून महाराष्ट्रात सत्तेसाठी स्थापन होत असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अवैध असल्याचा दावा केला आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात होऊ घातलेल्या या आघाडीला मान्यता मिळू नये, अशी मागणीही जोशी यांनी याचिकेत केली आहे.

Protected Content