मिलींद देवरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी ! : शिंदे गटात जाण्याची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसचे माजी लोकसभा सदस्य मिलींद देवरा यांनी आज पहाटेच आपण कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली आहे. ते लवकरच शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.

आजपासून राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असतांना कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे मुंबईतील नेते मिलींद देवरा यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज सकाळी मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे कॉंग्रेस पक्षासी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर केली आहे.

मिलींद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे आयुष्यभर कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा देखील दीर्घ काळ होती. केंद्र व राज्य या दोन्ही पातळींवर त्यांचा मोठा दबदबा होता. यानंतर मिलींद देवरा यांनी राजकारणात पदार्पण करत २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत दक्षीण मुंबईतून विजय संपादन केला. यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये मात्र त्यांना अपयश आले होते. यातच गेल्या काही महिन्यांपासून ते अडगळीत पडल्याने अस्वस्थ होते.

मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवार मिळणार नाही, असे स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपूर्वीच देवरा हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली होती. यातच त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आता ही शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे.

Protected Content