मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या व्हाटसअप क्रमांकावर आज आलेल्या मॅसेजमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. यासंदर्भातला तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसातील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर संशयास्पद बोट आढळून आली असून यात घातक शस्त्रात्रे मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. यातच आज दहशतवादी हल्ल्याचा संदेश मिळाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. या संदर्भात पवार म्हणाले की, अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा येत असतात. मुकेश अंबानींच्या कुटुंबालादेखील धमकी आली. खोलात गेल्यानंतर काही माथेफिरूंनी धमकी दिल्याचं लक्षात आलं. आज मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली गेलीच पाहिजे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. केंद्रीय यंत्रणांनीही त्यात लक्ष द्यावं, असं अजित पवार म्हणाले