राजकारण करुन शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यापासून भरकटवतात – गुरनाम सिंह

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन शेतकऱ्याला मूळ मुद्द्यापासून दूर लोटत असल्याचा टोला शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी लगावला आहे. राजकारण करणाऱ्या भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही असंही सिंह म्हणाले. 

कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मागील महिन्याभारपासून दिल्लीच्या सीमांजवळ आंदोलन करत आहेत. अनेकदा सरकारसोबत चर्चेच्या बैठकी घेऊनही सर्व चर्चा निष्फळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. आता या शेतकरी आंदोलनावरुन सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेसदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र या आंदोलनावरुन सुरु झालेल्या राजकारणावरुन आता शेतकरी नेत्याने देशातील दोन्ही प्रमुख पक्षांना खडे बोल सुनावले आहेत. नेते मंडळी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करुन शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यापासून दूर भटवण्याचं काम करतात. ना काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काही केलं ना भाजपाने शेतकऱ्यांसाठी काही केलं, असं रोखठोक मत सिंह यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना दोन्ही पक्ष देणगीच्या नावाखाली कॉर्पोरेट क्षेत्राकडून पैसे घेत असल्याने कोणीच स्वच्छ नियत असणारं नाहीय अशी टीकाही सिंह यांनी केलीय. 

“दोन्ही पक्ष कॉर्पोरेट क्षेत्राकडून निधी देणगी म्हणून घेतात. मी तर त्याला लाच असं म्हणतो. राजकीय पक्ष त्याला देणगी म्हणतात. जर भाजपाने एक हजार कोटी घेतले तर ५०० कोटी काँग्रेसनेही घेतलेत. कोणीही दूध से धुले म्हणजेच स्वच्छ नियत असणारे नाहीयत. आपल्या देशात पैशाने सत्ता विकत घेतली जाते. सत्तेत आल्यावर पुन्हा पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असं काळचक्र सुरु असतं,” अशा शब्दांमध्ये सिंह यांनी राजकीय पक्षांना फैलावर घेतलं. “या चक्रमध्ये शेतकरी भरडला जात आहे. हे म्हणजे (संरक्षणासाठी असणारा) कुत्रा आणि चोर एकत्र आल्यासारखं आहे. 

आपल्या देशात एका व्यक्तीची कमाई तासाला ९० कोटी रुपये आहे तर दुसऱ्याची तासाला ९ रुपये पण नाही. आपला देश सोने की चिड़िया होता ना? आता तर मातीची पण राहीला नाही. हीच आमची लढाई आहे. ही केवळ शेतकऱ्यांची नाही तर सर्वसामान्यांची लढाई आहे,” असा टोलाही सिंह यांनी लगावला आहे. 

 

 

Protected Content