मुंबईच्या महापौर फडणवीस , राज ठाकरे यांना भेटल्या

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्वांना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस, राज ठाकरे आणि आता शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं महापौर पेडणेकर म्हणाल्या. पुतळा बसवण्यात थोडा उशीर झाला. अनेक परवानग्या रखडल्या होत्या. आज बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातून पुतळ्याचं अनावरण होतंय हा योगायोग आहे”, असंही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नाहीत. आता जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर येतील.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. ९ फूट उंचीचा पुतळा, २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह ११ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

Protected Content