मुंबई (वृत्तसंस्था) आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामं करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार, अशी माहिती खासदार नवनीत राणा यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयामधअये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे, असेही राणा यांनी व्हीडीओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, नवनीत कौर राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल ६ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्यासह पती- आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.