मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटनेचा वंचित बहुजन आघाडीने घटनेतील गुन्हेगार शिंदे, घटना झाकून ठेवणारे शाळेचे संचालक मंडळ व पोलिस खाते या सर्वांचा तीव्र निषेध करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी २१ ऑगस्ट रोजी बदलापूर पोलिस ठाण्यात जॉइन्ट सीपी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन माहीती घेतली. या बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व न्याय प्रक्रिया ही पारदर्शक व कोणत्याही दबाव व हस्तक्षेपा पासून मुक्त राहिल अशी ग्वाही जनतेला मिळाली पाहीजे.
शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे, अशी माहिती आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. त्यामुळेच भाजपचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून झालेली नियुक्ती साशंकता निर्माण करणारी आहे. उज्वल निकम यांची खैरलांजी हत्याकांड केस त्याचप्रमाणे मोहसीन शेख झुंड हत्या केस मधिल भूमिका संशयास्पद आहे. दुसरे म्हणजे ॲड. उज्ज्वल निकम हे भाजपचे म्हणून या प्रकरणात हितसंबंधी आहेत. त्यामुळे या केस मध्ये सरकारी वकील म्हणून झालेली त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.