मितावली येथील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील मितावली येथील भाग्यश्री संजय इंगळे या दोन वर्षाच्या बालिकेचा अंगणात सर्पदंश झाल्याचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मुलगी रडत असल्याचे ऐकुन तिची आई घरातुन बाहेर आली असता मुलीच्या हाताला रक्त लागल्याचे पाहून व तिच्या तोंडातुन फेस आल्याने तिला सर्प चावल्याची शंका आली. मुलीचे वडील व शेजारील लोकांनी मुलीला तात्काळ चोपडा येथील उपजिल्हारूग्णालय येथे उपचारासाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी भाग्यश्रीला मृत घोषीत केले.यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.पोलीस विभागातर्फे रितसर पंचनामा करण्यात आला. डॉ.पंकज पाटील यांनी शवविच्छेदन करून मुलीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर,सर्पमित्र सागर बडगुजर,गिरीराज ग्रुपचे दिपक पाटील,मितावलीचे माजी सरपंच चंपालाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार कोळी यांनी सहकार्य केले.

विशेष असे की,दोन वर्षापुर्वी ह्याच बालिकेच्या आईला त्याच ठिकाणी सर्पदंश झाला होता.त्यांचेवर जळगांव येथील जिल्हा रूग्णालय येथे उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. तर काही दिवसांपुर्वी तेथेच सर्प निघाल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. दरम्यान, सर्पमित्र सागर बडगुजर यांनी ह्या घटनेची सविस्तर माहीती घेऊन तेथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवर सर्प पकडण्यासाठीची उपाययोजना सांगीतली.इकडे दवाखान्यात मुलीचे शवविच्छेदन सुरू होते,तिकडे ग्रामस्थांचे साप पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते.अखेर सर्पमित्र सागर बडगुजर यांनी सांगीतलेल्या उपाययोजनेनुसार तासभराच्या अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांना सुमारे पांच ते सात फुटाचा काळा नागसर्प पकडण्यात यश आले. यावेळी सारा गांव त्याच ठिकाणी जमा झालेला होता. फुलासारखी लहान मुलगी सर्पदंशाने मयत झाल्याने गांवात हळहळ व्यक्त होत होती. तर वेळीच साप पकडण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. भाग्यश्रीवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचे वडील संजय विक्रम इंगळे व आई सौ.भारती संजय इंगळे यांच्यावर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Protected Content