महिला वाहकाचा विनयभंग: आरोपीस सक्तमजुरी

 

जळगाव प्रतिनिधी | एसटी महिला वाहकासोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणून वेगवेगळ्या पद्धतीने तिची छेड काढली. विनयभंग केला. धावत्या एसटी बसमध्ये तिला मारहाण केली. याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने आरोपीस सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

पीडित २२ वर्षीय तरुणी पाचोरा शहरातील रहिवासी तथा एसटी महामंडळात वाहक पदावर नोकरीस आहे. दीपक प्रकाश पाटील (रा. पाथरी) हा पाचोरा-जळगाव बसमध्ये प्रवास करीत असताना या वाहकाची छेड काढत होता. यातच ५ जुलै २०१६ रोजी सकाळी ६.३० वाजता वाहक पाचोरा-जळगाव बसने जळगाव येथे क्लाससाठी येत होती. या वेळी पाथरी स्टॉपवरून दीपक पाटील बसमध्ये वाहक महिलेच्या शेजारी बसला. ही बस शिरसोलीजवळ पोहोचल्यानंतर दीपकने तरुणीचा हात धरून विनयभंग केला. तसेच तिच्या गालावर चापट मारली होती. यावेळी तिने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दीपकविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायाधीश एम. वाय. नेमाडे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीअंती दीपक याला दोषी धरून शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील अडीच हजार पीडित महिला वाहकास देण्याचे आदेश केले आहेत. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले.

Protected Content