केंद्र सरकारच्या वैद्यकीय आयोगाविरुद्ध जळगावातही डॉक्टरांचा बंद

WhatsApp Image 2019 07 31 at 9.43.06 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (नॅशनल मेडिकल कमिशन) विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी देशातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जवळपास २००० खासगी दवाखाने बंद होते तर शहरातील ६५० खासगी डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला होता.

आयएमए या संघटनेतर्फे बुधवार रोजी बंद पुकारण्यात आला. डॉक्टरांच्या या संपामुळे जळगाव जिल्ह्यात रुग्णसेवा विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात रुग्णहाल झाले. खासगी दवाखाने बंद असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढला होता. जवळजवळ सर्व खासगी हॉस्पिटल बंद होते. ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थांना संपाची कल्पना नसल्याने ते जळगावात उपचारासाठी आले असता त्यांना विना तपासणीच माघारी परतावे लागले. हॉस्पिटल्स बंद असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची सकाळपासून गर्दी झाली होती. डॉक्टरांचा संप असल्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या तसेच शहरातील रुग्णांचे चांगलेच हाल झालेत. तपासणी व उपचारासाठी अनेक रुग्णांना त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. मात्र, ओपीडी बंद असल्याचे सांगितल्याने रुग्णांना घरी परत न्यावे लागले. तर काही नातेवाइकांनी उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथेही गर्दी असल्याने नातेवाइकांची फिरफिर होत त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Protected Content