जळगाव, प्रतिनिधी । भारत पेट्रोलियम, एमआयडीसी जळगाव येथील माथाडी कामगारांना पीपीइ किट उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी सहा कामगार आयुक्त यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
भारत पेट्रोलियम,जळगाव येथे घरगुती गॅस सिलेंडर्स रिफिलिंग प्लॅन्ट आहे. त्या ठिकाणी दररोज १०० ट्रक लोडिंग अन लोडिंग होतात. सदर काम माथाडी कामगार करतात. अत्यावश्यक सेवा असल्याने सदर काम अविरत सुरू आहे व माथाडी कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहे. भारत पेट्रोलियम येथे विविध जिल्ह्यातील शंभर ट्रक रोज येत असतात. अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तेथील ट्रक सुद्धा येत आहेत. अशामुळे कामगारांना संक्रमण होण्याचा जास्त धोका आहे. याबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊन माथाडी कामगारांना पीपीइ किट त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी विनंती अध्यक्ष ऍड. देशपांडे यांनी सहा कामगार आयुक्त यांना केली आहे.