मुंबई: वृत्तसंस्था । सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे
मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला असून नुकतीच मुंबईतील एच ए रिलायन्स रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया झाली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. महेश मांजरेकर किंवा कुटुंबीयांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. बिग बॉसच्या पहिल्या दोन्ही पर्वांच्या सूत्रसंचालनाची धुरा मांजरेकरांनी पेलली होती. त्यांच्या अनोख्या शैलीला चाहत्यांची विशेष पसंतीही मिळाली आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव यात बदल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.