महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत; अजित पवारांची घोषणा

 

मुंबई : वृत्तसंस्था | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना महिला दिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे.  महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत मिळणार आहे. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतच अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली होती.

 

“माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी ८ मार्चचं महत्व सांगितलं होतं. आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे,” असं अजित पवार म्हणाले.

 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे. कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल”.

 

दरम्यान राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना आपल्या गावापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने ही योजना सुरु करण्यात येईल.

Protected Content