जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महारष्ट्र विद्यापीठामध्ये सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ५७ हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना भवानी नगरातील दांडेकर नगरात घडली. याप्रकरणी बुधवारी १७ मे रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भवानी मंदिराजवळील दांडेकर नगरात जयश्री घनशाम देशमुख (वय-५२) या वास्तव्यास असून त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक पदावर कार्यरत आहे. मंगळवारी १६ रोजी सकाळी १० वाजता त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश करीत घरातून सोने व चांदीचे दागिने असा एकूण ५७ हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबवून नेला. जयश्री देशमुख या सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांच्या बिल्डींगमध्ये राहणार्या महिलांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी देशमुख यांच्या बेडरुमधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्याठिकाणावरील ऐवज लांबविला. तसेच तेथे ठेवलेले कपडे व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. त्यानंतर बुधवारी १७ मे रोजी दुपारी ३वाजता जयश्री देशमुख यांनी रामानंद नगर पोलसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.