जळगाव प्रतिनिधी । भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात राजकीय क्षेत्रात महिलांना समान हक्क दिलेला आहे. महिला आपल्या कतृत्वाने आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असताना मुलींचा जन्म दर अजूनही मुलांच्या तुलनेत कमी आहे, ही बाब समाज मनाला वेदना देणारी आहे. महिलांना राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये समान संधी असताना बऱ्याचदा कौटुंबिक निर्णयात मात्र समाज त्यांना समान हक्क देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. ही समाजातील एक सामाजिक विषमता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.
येथील नियोजन भवनात बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत होणाऱ्या राष्टीय बालिका सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, माझी कन्या भागश्री योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मुलींचा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड.ठोंबरे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, माझी कन्या भागश्री योजनेंतर्गतचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश संपादन केलेल्या मुली व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातून आपण मुलींना समानतेची वागणुक द्यावी, त्यांना शिकविले पाहिजे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात महिलांना समाविष्ठ करून घेणे आवश्यक आहे. तरच आपण त्यांना न्याय देऊ शकू, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी शेवटी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मुलींच्या जन्मदरात होत असलेल्या वाढीबाबत समाधान व्यक्त करतानाच मुली-मुले समानतेवर चर्चा करताना मुला-मुलींचा जन्मदर हा समान असल्यावरच सामाजिक लिंगविषयक असमानता दुर होण्यास मदत होईल. यासाठी पुरूषांबरोबरच महिलांनीही सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियांतर्गत सुरू असलेले कार्य आणि त्याचे परिणामस्वरूप मुलींच्या जन्मदरात होत असलेल्या वाढीचा आढावा सादर केला. तसेच या कामात सर्व यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत होणाऱ्या राष्टीय बालिका सप्ताहानिमित्त जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा वर्कर, आरोग्य सेविकांचा आणि सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा महिला बाल विकास कार्यालयतील विधी अधिकारी संध्या वानखेडे आणि यशश्री पाटील यांनी तर आभार श्री.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.