प्रसुतीनंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी दुपारी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त मयत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.

आरती विकास गवळी (२२, रा. समता नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, समता नगरातील आरती गवळी यांना शनिवार, १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिकाऊ डॉक्टरांनी सिजरद्वारे महिलेची प्रसुती केली. रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होवून प्रकृती चिंताजनक झाली होती. महिलेची प्रकृती अधिकची बिघडली. मध्यरात्री १ वाजता महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. त्यानंतर अकरा दिवसांपासून महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गुरूवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी आरती गवळी यांची उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेह कुटूंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणून शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबियांसह नातेवाईकांनी केला. तसेच महिलेची ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन व्हावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांनी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले.

Protected Content