भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील महिंदळे येथे मकर संक्रांती भोगीचा दिवस पौष्टीक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्या निमित्ताने मौजे महिंदळे ता.भडगाव येथे मकर संक्रांती भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, बाजरी मिनी किट व पौष्टिक तृणधान्यांची माहितीपत्रके वाटप करून साजरा करण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास १९४ देशांनी त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करताना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढविणे व पौष्टिक तृणधान्याची आरोग्य विषयक महत्त्व बाबत जनमानसात जनजागृती करणे, तृणधान्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्यासह विविध उपपदार्थ तयार करणे व त्यांचा आहारात समावेश वाढविणे असे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून मकर संक्रांती-भोगी हा दिवस संक्रांतीनिमित्त यापुढे दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करणे बाबत निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार १४ जानेवारी २०२३ रोजी कृषी विभागाचे वतीने महिंदळे तालुका भडगाव येथे मकर संक्रांती भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सहभाग घेऊन संपूर्ण गावात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढावे याकरता शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणार्या विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली त्याच बरोबर प्रभात फेरी दरम्यान व कार्यक्रमादरम्यान पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रके व लीफलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील मूल्य व त्याचे आहारातील महत्त्व या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली तसेच लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आरोग्याच्या समस्या – स्थूलता , बद्धकोष्ठता , मधुमेह महिला व लहान मुलांमध्ये अनेमिया यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे नियमित सेवन करण्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये ज्वारी , बाजरी, नागली, भगर, राळा यासारख्या पौष्टीक तृणधान्यांचा समावेश वाढविणे त्याचबरोबर सदरील पौष्टिक तृणधान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ , बेकरीचे पदार्थ तयार करणे शक्य असून त्यांचा आहारात वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर शासना मार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लक्ष रुपयांपर्यंत प्रक्रियेसाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी , युवकांनी , बचत गटाच्या महिलांनी लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभे करावेत असे सदर प्रसंगी बोलताना आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांनी शेत तिथे तृणधान्ये व मिनिट ऑफ द मंथ या संकल्पना शेतकर्यांपर्यंत रुजवून आत्मसात करणे बाबतचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी उत्तम जाधव यांनी पौष्टिक तृणधान्याचे मुलांच्या आरोग्यातील महत्व विषयी तसेच पौष्टीक तृणधान्य दिवसाचे महत्त्व विषद करून जास्तीत जास्त लोकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढविणे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम वेळी उपस्थित शेतकर्यांना व महिलांना बाजरी पिकाचे धनशक्ती या लोह व जस्त युक्त वाणाचे मिनी किटचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचबरोबर बचत गटाच्या महिलांना भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब पाटील, सर्व शाळेचे शिक्षक वृंद, पंचायत पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख साहेब , मंडळ कृषी अधिकारी कजगाव अनिल तायडे साहेब, महिंदळे गावचे विद्यमान सरपंच मोहन पाटील, पोलीस पाटील, लोकमतचे पत्रकार भास्करराव पाटील, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुरेखाताई पाटील , कृषी सखी जयश्रीताई पाटील , ग्रामपंचायत सन्माननीय सर्व सदस्य, प्रगतिशील शेतकरी भिकन पाटील सह मोठ्या संख्येने महिला व शेतकरी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कृषी सहाय्यक जाधव साहेब, वैशाली पाटील, सुखदेव गिरी , सचिन पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमात आभार प्रदर्शन कृषी सहायक वैशाली पाटील यांनी केले.