पाचोरा, प्रतिनिधी । विज वितरण कंपनीची घरगुती ग्राहक, कृषी पंप, विविध लघु उद्योग, कारखाने यांचेकडे मोठ्या स्वरुपाच्या थकबाक्या असल्याने या थकबाक्या विज वितरण कंपनीने वसुल करण्यासाठी वेगळाच फंडा आयोजला आहे. जी ग्रामपंचायत आपल्या गावातील घरगुती विज ग्राहक, कृषी पंप व परिसरातील विविध उद्योजकांचे विज बिले वसूल करेल त्या ग्रामपंचायतीस वसुलीच्या ३३ टक्के प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे.
या उत्पन्नातुन ग्रामपंचायत स्तरावर नविन कृषी पंप विज जोडणी, वितरण रोहित्रांची (डी. पी.) संख्या वाढविणे, नविन वितरण रोहित्र (डी. पी.) बसविणे, लघु दाब वाहिनीचे बळकटीकरण करणे, ११ के. व्ही. व २२ के. व्ही. वाहिण्याचे बळकटीकरण करणे यासाठी उपयोग केला जाणार आहे. वसुलीच्या अधिकारा बाबतचे पत्र लवकरच सर्व ग्रामपंचायतींना देण्यात येणार असल्याची माहिती विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. ए. दासकर व अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांनी सांगितले.
विज वितरण कंपनीचे कृषी पंप विज जोडणी धोरण व वसुलीबाबत ग्रामविकास विभागाचा सहभाग ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राम पातळीवर कृषी पंप ग्राहकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत आणि वि. का. संस्थांमध्ये विज बिले भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. यात विज बिल वसुलीसाठी प्रति पावती ५ रुपये, थकीत विज बिल वसुल केल्यास थकबाकीच्या ३० टक्के प्रोत्साहनपर निधी, चालु विज बिल वसुल केल्यास वसुलीच्या २० टक्के निधी देण्याबाबत विज कंपनीने विचार केला आहे. यात वसुलीच्या ३३ टक्के रक्कम ही महावितरणच्या विभागीय पातळीवर त्या ग्रामपंचायत हद्दीतील कृषी पंप ग्राहकांसाठी पायभुत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापर केला जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीकडुन वसुल झालेल्या ३३ टक्के रकमे पर्यंतचा वापर पालकमंत्री यांचे आदेशाने जिल्ह्यातील कृषी पंप ग्राहकांसाठी पायाभुत सुविधा सुधारण्यासाठी वापरण्यात येईल. उर्वरित ३४ टक्के रक्कम उपकेंद्रांमध्ये स्टेशन टाईप व कॅपिसीटर बसविणे, खराब झालेले कॅपिसिटर बदलविणे, उप केंद्रामधील आर्थिंग बसविणे / बदलविणे, उप केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीची कामे करणे, नविन वितरण रोहित्र उभारणे, आवश्यक उच्च दाब व लघु दाब वाहिनी उभारणे यासारखी कामे केली जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र कृषी पंप विज जोडणी धोरण २०:२० योजने अंतर्गत ३० मिटरच्या आत सर्व कृषी पंप ग्राहकांना तात्काळ विज कनेक्शन देणे, लघु दाब वाहिनीपासुन २०० मिटरच्या आत असलेल्या नविन कृषी पंप ग्राहकांना बॅच केबल द्वारे ३ महिन्याचे आत नविन विज कनेक्शन देणे, ६०० मिटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना सौर ऊर्जा अथवा उच्च दाबावर वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध करून देणे, मागासवर्गीय कृषी पंप ग्राहकांसाठी विज जोडणीस सवलत देणे यासारख्या विविध योजना हाती घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शाम ए. दासकर यांनी दिली आहे.