मुंबई प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील सरकार संकटात आल्यानंतर अन्य राज्यांमध्येही हा फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याची शक्यता असून या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी सरकार सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अपवाद वगळता कोणत्याही मोठ्या नेत्याने अद्याप भाष्य केलेले नाही. मात्र या घडामोडींचा राज्यातील राजकीय स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर, सोशल मीडियात राजस्थानातही ‘ऑपरेशन लोटस’ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, याच्या जोडीला महाराष्ट्रातही याच प्रकारचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेत भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना अजून ३९ जागांची आवश्यकता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात फुट पाडणे तसे सोपे नाही. तथापि, भाजपने मध्यप्रदेशात ज्या प्रकारे मोठी खेळी केली, अगदी त्याच प्रकारे या तिन्ही पक्षांमध्ये फुट पाडणे हे कठीण असले तरी अशक्य नसल्याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. यामुळे या प्रकरणी अद्याप कुणा मोठ्या नेत्याने भाष्य केले नसले तरी मध्यप्रदेशातील घडामोडींवर सर्व मान्यवर नेते लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.