तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?”

 

 

 

पुणे : वृत्तसंस्था । तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,” अशा खरमरीत शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 

 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात खडाजंगी सुरू आहे. जेजूरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पडळकर यांनी शरद पवार आणि अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी पडळकरांना नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिलंय.

 

“शिवचरित्र सांगून लाख-लाख रुपये कमावणारा बाजारू, अशा शब्दांत पडळकर यांनी मिटकरींना लक्ष्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना, “मी शिवचरित्र सांगितलं. फाट्यावर दारू तर विकली नाही ना. एखाद्या वृद्ध महिलेची २ कोटींची जमीन ५ लाखात तर हडप केली नाही ना?”, असा सवाल मिटकरींनी विचारला. तसेच, “मी बोलायला लागलो तर संपूर्ण कुंडली तयार आहे. पण वेट अँड वॉच. समय जरुर आयेगा. ज्या दिवशी बोलेन, त्या दिवशी पळता भुई थोडी होईल”, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, असंही मिटकरी म्हणाले.

 

भुंकणाऱ्या कुत्र्याकडे बैल एकदा, दोनदा किंवा तिनदा दुर्लक्ष करतो. पण चौथ्यांदा मात्र लाथ घालतो. मला आमदारकी देणारे आमचे गुरु सांगतात की विरोधासाठी विरोध करायचा नाही. शांत बसायचं. पण टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करायचा, असं मिटकरी म्हणाले. काही जण म्हणतात, मिटकरी फक्त भाषणं करतात. ते बाजारू आहेत. त्यांना म्हणावं आज खरी भाषणं देतोय म्हणून आमदार झालोय. खोटी भाषणं दिल्यास पंतप्रधानदेखील होता येतं, अशा शब्दांत मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.

 

मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी मिटकरी यांनी भाजपा, केंद्र सरकार आणि पडळकरांवार नाव न घेता सडकून टीका केली.

Protected Content