Home Cities अमळनेर नितीन राऊत यांचा राजीनामा घ्यावा : भाजपची मागणी

नितीन राऊत यांचा राजीनामा घ्यावा : भाजपची मागणी

0
107


अमळनेर प्रतिनिधी | राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वत:च्या मुलासाठी शासकीय यंत्रणेला वेठीस धरल्याचे दिसून आले असून यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चातर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तसेच युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक कॉंग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे.कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे.राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी कॉंग्रेसच्या दावणीला बांधत असून हे योग्य नाही.

यात पुढे नमूद केले आहे की, सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत आहोत.
सदर प्रकार अतिशय गंभीर असून अश्याच एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही संदर्भात निवेदन अमळनेर तहसिलदार यांना देण्यात आले.कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देखील देण्यात आला यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत,शहराध्यक्ष पंकज भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound