महामार्गावर आयशरने दुचाकिला उडविले; पुरूष व महिला जखमी

जळगाव प्रतिनिधी । भरधाव आयशरने पल्सर दुचाकीला दिलेल्या धडकेत दाम्पत्य जखमी झाले असून अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाला नशिराबादजवळ अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजबसिंग उदयसिंग पाटील (वय-३६) व पत्नी कविता अजबसिंग पाटील (वय-३०) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या (एमएच १९ बीडी-४८९) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावकडून एरंडोल तालुक्यातील खेडी येथे नातेवाईकांकडे लाग्नासाठी जात होते. सोबत त्यांचा मुलगा दर्शन पाटील आणि साडूचा मुलगा सौरभ महाले होते. राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी ते खोटे नगर रिक्षा स्टॉपच्या दरम्यान तिरूपती ट्रेडर्ससमोर पाळधीकडून येणार्‍या (एमएच १९ बीजी ८१८०) क्रमांकाच्या आयशरने या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. यात अजबसिंग उदयसिंग पाटील यांच्या हाताला तर सोबत असलेल्या कविता पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सोबत असणार्‍या दोन मुलांना मात्र सुदैवाने काही लागले नाही. दरम्यान, संबंधीत आयशर चालकाने दुचाकीला उडविल्यानंतर तो घटनास्थळी न थांबता फरार झाला. त्याला नशिराबाद येथे अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गजानन पाटील यांनी धाव घेवून जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ रवाना केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Protected Content