महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर!

 

जळगाव, प्रतिनिधी । शहराच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारत प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करणाऱ्या महापौर जयश्री महाजन यांनी लागलीच कामाला सुरुवात केली आहे. महापौरांनी पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला असून जास्तीत जास्त बेड वाढविण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच लसीकरणाचे केंद्रे देखील लवकरात लवकर वाढविण्याचेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात आयोजित बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, सभागृह नेते ललित कोल्हे, रियाज बागवान, प्रशांत नाईक, उपायुक्त कपील पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. संजय पाटील, बाबा साळुंखे, डॉ. विजय घोलप यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी सर्वप्रथम कोरोना रुग्णांसाठी सध्या असलेल्या व्यवस्थेची माहिती आणि सोयसुविधांचा आढावा घेतला. कोविड सेंटर आणि शहर मनपाकडून केल्या जाणाऱ्या उपायांची महापौरांनी माहिती घेतली.

 

बेडची संख्या जास्तीत जास्त वाढवा

शहर मनपाकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासह इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत असून त्यादृष्टीने जास्तीत जास्त बेडची संख्या वाढवावी, शक्य असल्यास आणखी काही कोविड सेंटर सुरू करावे लागले तर तशी तयारी देखील ठेवा, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

 

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

जळगाव मनपाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ आणि तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व कोविड सेंटरने आपसात समन्वय ठेवावा. जर आपल्याकडे जागा शिल्लक नसेल तर त्यांना खाजगी मोफत कोविड सेंटरला पाठविण्यात यावे, असेही महापौरांनी सांगितले. नागरिकांची आणि नातेवाईकांची फिराफिर होऊ नये यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. जळगाव ग्रामीणचे काही रुग्ण देखील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत, ग्रामीणच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर असावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून ते तशी व्यवस्था करणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

 

कोविड रुग्ण आणि सामान्य व्यक्तींसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार व्यवस्था करावी

जळगावात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी नेरीनाका स्मशानभूमी केवळ कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी राखीव होती. पुन्हा आता तशी परिस्थिती आली असून त्यादृष्टीने व्यवस्था करावी. कोरोनाने मृत्यू होणारे आणि सामान्य व्यक्तींसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार व्यवस्था करावी. अंत्यसंस्कारप्रसंगी होणारी गर्दी अद्यापही नियंत्रणात येत नसून त्यासाठी कार्यवाही करावी, असेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

Protected Content