प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय अध्यापकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विविध प्रकारचे भत्ते त्यासाठी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय अध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मागण्या मान्य करा, अन्यथा कामबंद आंदोलनाचा असा इशारा या निवेदनात शासनाला देण्यात आला आहे.

यात ‘विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे मिळाले पाहिजे. करार पद्धतीने नियुक्त्याचा निर्णय रद्द करावा अशा विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक दि.१४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. बुधवारी ९ मार्च रोजी आंदोलन तीव्र झाले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. मागण्या मान्य करा, अन्यथा काम बंद आंदोलन पुकारले जाईल’ असा इशाराही निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. सोमवारी ७ रोजी घंटानाद करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना घेराव घालण्यात आला होता.

सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

बुधवारी ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना प्राध्यापकांनी निवेदन दिले. निवेदनातील मागण्यांबाबत सविस्तर सांगून, अनेक वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. काम करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशीही विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, आपल्या मागण्या शासनाकडे पाठवतो. यावेळी, शासनापर्यंत आमच्या मागण्या पोहोचवा, झोपलेले वैद्यकीय शिक्षण खाते कधी जागे होईल ? असा सवालही अध्यापकांनी विचारला.

पुढील दोन दिवस अधिष्ठाता कार्यालयासमोर घोषणा देऊन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या सचिव डॉ.योगीता बावस्कर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ.किशोर इंगोले, डॉ. अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, डॉ.योगिता सुलक्षणे, डॉ.संगीता गावित, डॉ.इमरान तेली, डॉ.भारत घोडके, डॉ.विजय गायकवाड, डॉ.धनश्री पाटील, डॉ.जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ.निलेश देवराज, डॉ. गणेश लोखंडे, डॉ.बाळासाहेब सुरोशे, डॉ.चेतन भंगाळे, डॉ.किरण सोनवणे, डॉ.मनोज पाटील, डॉ.हर्षल महाजन, डॉ.मोनिका युनाती, डॉ.अनिल पाटील, डॉ.श्रीनिवास लोंढे आदी. अध्यापक निवेदन देताना उपस्थित होते.

Protected Content