महापौरांनी घेतली कोरोना प्रतिबंधासाठी मलेरिया विभागाची बैठक

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अस्वच्छता दूर करून औषधींची फवारणी योग्य प्रमाणात करण्यासाठी मलेरिया विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव होऊ नये, जीव जंतूंचा नाश व्हावा यासाठी मलेरिया विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी बोलावली होती. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, आरोग्य पर्यवेक्षक सुधीर सोनवाल यांच्यासह मलेरिया विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. महापौर भारती सोनवणे यांनी मलेरिया विभागाची सद्यस्थिती व शहरासाठी आवश्यक बाबी याची माहिती सुरुवातीला जाणून घेतली. मलेरिया विभागात मनपाचे ४० कर्मचारी असून सरासरी दररोज २८ कर्मचारी कामावर असतात. त्यांच्यामार्फत फवारणी, धुरळणी, अबेटिंग करण्यात येते. शहरात अंदाजे १ लाख २० हजार घरे असून एक कर्मचारी १०० घरांचे सर्व्हेक्षण करतो. दररोज १०० याप्रमाणे आठवड्यात सरासरी ६०० घरांचे सर्व्हेक्षण होते अशी माहिती त्यांनी दिली.

मनपा करणार उपाययोजना
मलेरिया विभागात सध्या औषधांचा साठा ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. पावसाळयात शहरात स्वच्छतेसाठी अतिरिक्त ६० माणसांची आवश्यकता भासणार आहे. तसेच ३०० लीटर अबेटिंग सोल्युशन, ३०० लीटर सायफेनोथ्रीम आणि ४ वाहने आणि २० फवारणी पंप लागणार असल्याची माहिती मलेरिया विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करून मनपाकडून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

कामचुकारांची गय करणार नाही
मलेरिया विभाग शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विभाग आहे. मनपा आणि जळगावकरांचे हित लक्षात घेऊन काम करणाऱ्यांच्या आम्ही नेहमी पाठीशी आहोत परंतु काम चुकारपणा करणाऱ्यांची आम्ही गय करणार नाही असा इशारा देखील महापौर भारती सोनवणे यांनी दिला आहे.

Protected Content