जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यावर देखील नगरसेवकपदी कायम राहिल्याने विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवार १३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यात महापालिकेतील भाजपाचे ४ नगरसेवक अपात्र ठरविले आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे महापालिकेसह राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
जळगावातील घरकुल घोटाळ्याचा निकाल धुळे न्यायालयाने ४ वर्षापुर्वी दिला होता. या निकालात संशयीत आरोपींना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली होती. या निकालानुसार जळगाव महानगरपालिकेत विद्यमान असलेले पाच नगरसेवक लता रणजीत भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, दत्तात्रय कोळी हे अपात्र ठरले. मात्र त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही, त्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात ३ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेचा खटला न्यायालयात सुरू होता. मध्यंतरी कोरोना महामारीचा काळ आल्यामुळे याची केवळ कामकाज झालेले नव्हते. आता त्यावर कामकाज झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता निकाल दिला आहे.
दत्तात्रय कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली असल्यामुळे त्यांच्याविषयी काही आदेश झालेले नाही. तर भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे, सदाशिव ढेकळे हे अपात्र ठरले आहेत. जळगाव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायमूर्ती सय्यद यांनी अपात्रतेसंदर्भात गुरुवारी निकाल दिला आहे. अपात्र नगरसेवकांच्या वतीने अँड. प्रदीप कुलकर्णी तर याचिकाकर्ते प्रशांत नाईक यांच्यावतीने अँड. सुधीर कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली.