जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महानगरपालिका हद्दितील मिळकत धारकांसाठी मालमत्ता करासाठी शास्ती माफीची अभय योजना राबविण्यात येत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
थकीत रक्कमेवरील आकारलेल्या शास्तीत सवलत देणेसाठी दि. १४ ते दि. ३१ मार्च मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी ५० टक्के शास्ती माफीची अभय योजना राबविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत खुला भुखंड करावरील कराधान नियम ४१ अंतर्गत शास्तीत १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शास्तीत सवलत मिळविण्यासाठी यापुर्वीच शास्तीची सर्व रक्कम भरणा केलेल्या मालमत्ता धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच या योजनेअंतर्गत कोणत्याही स्वरुपाचा परतावा दिला जाणार नाही. या योजनेत लाभ घेण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांना मालमत्ता कराचा खुला भुखंड कराचा संपुर्ण भरणा करणे आवश्यक राहील. मालमत्ता करासंबंधीत दावा न्यायालयात प्रलंबीत असल्यास प्रथमत: सदर दावा न्यायालयातून काढून घेवून त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतरच सदर योजनेचा लाभ घेता येईल. ज्या मिळकतींना / गाळेधारकांना नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे, अशा मिळकतधारकांना / भोगवटादारांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेच्या अंमलबजाणीमध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याबाबत अंतीम निर्णय आयुक्त यांचा राहणार आहे.तरी या अभय योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महसूल उपायुक्त प्रशांत पाटील यांनी केले आहे.