जिल्हा कारागृहातून फरार झालेल्या एका कैद्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा कारागृहातून तीन कैदी 25 जुलै रोजी रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून फरार झाले होते. त्यातील सागर पाटील यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नवापूर येथून सापळा रचून शिताफीने अटक केली. उर्वरित गौरव पाटील गुजरातमध्ये तर सुशील मगरे अद्यापि बेपत्ताच असल्याची माहिती मिळाली.

येथील जिल्हा कारागृहातून तीन कुख्यात आरोपी बंदुकीचा धाक दाखवून पळाल्याची घटना 25 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. बाहेर उभ्या असलेल्या संशयित जगदीश पुंडलिक पाटील याच्या दुचाकीवर चौघे पळाले होते. घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींचा शोध सुरूच होता.

फरार झालेले कैदी
सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड ता. अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती. सकाळी 7.28 वाजता मुख्य गेटमधून तिघेही बाहेर पळाले होते.

त्यांना पलायनास मदत करणाऱ्या जगदीश पुंडलिक पाटील रा.पिंपळकोठा ता.एरंडोल यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने साक्री येथून एका खाजगी लक्झरी बसमधून 24 ऑगस्ट रोजी शिताफीने अटक केली होती. त्याला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

दरम्यान एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर येथे सागर संजय पाटील हा येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, सागर पाटील हा सुरत मध्ये असल्याची माहिती मिळाली होती. सपोनि स्वप्निल नाईक यांच्या पथक मागे असल्याची कुणकुण लागताच सागर बुधवारी रात्री फरार झाला . गुरुवारी रात्री नवपुरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस कर्मचारी रवी पाटील आणि सहकाऱ्यांनी नवापुरात शोध सुरु केला. सागर सामान्य रुग्णालयाबाहेर मित्राला भेटायला येणार असल्याचे समजताच तेथे दुपारी सापळा लावला आणि 3 वाजेच्या सुमारास सागर जेरबंद झाला. दरम्यान, फरार होण्यासाठी वापरलेली पांढरी विना क्रमांकाची दुचाकी पारोळा ते राजवड रस्त्यावर हिरापूर फाट्याजवळ लपवून ठेवलेली आढळून आली आहे. रात्री त्याने ती पथकाला काढून दिली असल्याची माहिती मिळाली.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील नाईक, स.फौ नारायण पाटील, पोहेकॉ रामचंद्र बोरसे, पो.ना. मनोज दुसाने, महेश पाटील, चालक प्रविण हिवराळे हे सुरत येथे आरोपीचा शोध घेत होते. तर पोहेकॉ रविंद्र पाटील, कमलाकर बागुल, पो.ना. रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी, स. फौ. विजय पाटील, दिनेश बडगुजर, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, नंदु पाटील, दत्तात्रय बडगुजर, दिपक शिंदे, परेश महाजन, विजय शामराव पाटील, रमेश जाधव, कमलाकर बागुल, इंद्रिस पठाण, किरण धनगर, दिपक पाटील आदी पथक रवाना झाले.

Protected Content