जळगावातील तरूणाच्या खुनाला पूर्व वैमनस्याची किनार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शहरात रात्री उशीरा झालेल्या खुनाला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे निष्पन्न झाले असून यात दोन जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल मध्यरात्रीच्या नंतर शहरातील निवृत्ती नगरात राहणार्‍या भावेश उत्तम पाटील ( वय २८ ) या तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली. यात कुटुंबियांनी दिलेल्या माहितीतून या घटनेमागील मारेकर्‍यांची नावे निष्पन्न झाली.

या संदर्भात मयत भावेश उत्तम पाटील यांचा चुलतभाऊ कैलास मंगल पाटील ( रा. आव्हाणे ) यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, निवृत्तीनगर भागात असणार्‍या बंधन बँकेच्या समोर रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास भावेश उत्तम पाटील यांची हत्या करण्यात आली. मनीष नरेंद्र पाटील (वय २२ रा. आव्हाणे, ता. जळगाव ) आणि भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) या दोघांनी पूर्व वैमनस्यातून भावेशवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा नमूद केले आहे.

यानुसार मनीष नरेंद्र पाटील (वय २२ रा. आव्हाणे, ता. जळगाव ) आणि भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) या दोघांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकामध्ये भादंवि कलम ३०१ आणि कलम ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खूनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, सपोनि किशोर पवार आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो.नि. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जितेंद्र सुरवाडे हे करत आहेत. तर हा प्रकार अवैध वाळू व्यवसायातून घडल्याची चर्चा देखील सुरू आहे.

 

Protected Content