धरणगावच्या आखाड्यात रंगली फलकाची कुस्ती

धरणगाव-अविनाश बाविस्कर | शहरात पार पडलेल्या कुस्तीच्या महासंग्रामात देशभरातील मल्लांनी आपापले कौशल्य पणास लावले. मात्र याचसोबत स्वागत फलकाचे नाट्य देखील चांगलेच रंगले.

धरणगावची परंपरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या श्रावण महिन्यातील कुस्त्या काल सायंकाळी पार पडल्या. ब्रिटीश काळापासून या कुस्त्या सुरू असून देशभरात याची ख्याती आहे. यानुसार काल सायंकाळी उशीरापर्यंत कुस्तीचा महासंग्राम रंगला. यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने हरियाणाच्या मल्लास चीत करून खान्देश केसरी हा बहुमान पटकावला.

दरम्यान, एकीकडे कुस्त्यांची दंगल रंगली असतांना दुसरीकडे मानापमान नाट्य देखील रंगले. कुस्त्या सुरू असलेल्या ठिकाणाजवळ पाहुण्यांसाठी व्यासपीठ बनवण्यात आले होते. त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे पोस्टर लावण्यात आल्याने शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आक्षेप घेतला. यानंतर वाघ हे पदाधिकार्‍यांसह तेथून निघूनही गेले.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री व्यायाम प्रसारक मंडळाला यावर्षी १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांचे स्वागत फलक प्रमुख पाहुण्यांना कुस्त्या पाहण्यासाठी ठेवलेल्या व्यासपीठाजवळच होते. या बॅनरवरून त्या ठिकाणी मानापमान वाद रंगला. संचालक मंडळाचे सदस्य, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी त्या पोस्टरला आक्षेप घेतला. श्री व्यायाम प्रसारक मंडळाची परवानगी न घेता हे पोस्टर का लावले? अशी विचारणा केली. त्यानंतर ते नगराध्यक्ष निलेश चौधरी व माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यांना वारंवार आखाड्यात येण्याचे आवाहन करूनही ते आले नाहीत.

तर, दुसरीकडे, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, माजी जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्त्या पार पडल्या. अर्थात, एकीकडे कुस्तीची दंगल सुरू असतांना दुसरीकडे स्वागत फलकावरून शहरात मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून आले.

Protected Content