चंद्रकांत पाटील कोथरुड मतदारसंघातून लढणार

chandrakant patil

 

पुणे प्रतिनिधी । पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या मंत्रिपदासोबतच पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यामुळे राज्यासह पुण्याच्या भाजपच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदूही त्यांच्या रूपाने कोथरूडकडे सरकरण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पक्षाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि कोल्हापूरच्या मातीतील ‘स्ट्राँग मराठा’ पहिलवानाला थेट पुण्यातील कोथरूडसारख्या सुरक्षित मतदारसंघात उतरवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पुणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात प्रदेशाध्यक्ष असलेल्या वरिष्ठ मंत्र्यांना उतरवून थेट शरद पवार यांनाही हे आव्हान देण्यात आले आहे, तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा केंद्रबिंदूही पुढील काळात चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरूडकडे सरकण्याची चिन्हे आहेत.

पाटील हे विधान परिषदेच्या पुणे पदवीधर संघाचे प्रातिनिधित्व करीत आहेत. गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान वारंवार दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना थेट पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातूनच विधानसभेत पाठविण्याची खेळी भाजपने खेळली आहे. स्थानिक भाजपमधील समीकरणे त्यामुळे बदलणार आहेत. माजी पालकमंत्री आणि खासदार गिरीश बापट यांच्या शहरातील वर्चस्वाला हे आव्हान मानले जात असून, शहरात नवे नेतृत्व तयार करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद देऊन पाटील यांना शहरात स्थिरावण्यासाठी वेळ दिल्यानंतर आता त्यांच्याकडे पुण्याचे संपूर्ण पालकत्त्व देण्यासाठीच कोथरूडसारखा मतदारसंघ देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Protected Content