महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत सोडवाव्यात : तहसिलदार देवगुणे

रावेर, प्रतिनिधी ।  महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे .महसूल विभागाची नाळ नेहमी शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करून नागरिकांचे समाधान होईल असे संवाद साधावा असे प्रतिपादन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले

तहसिलदार उषाराणी देवगुणे म्हणाल्या की, जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष मानले जाते. यानुसार १ ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. यादिवशी आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे .शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे. जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौंणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाई, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे या सह इतर सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना,रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यामार्फतच राबविल्या जातात. लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आवाहन सौ देवगुणे या महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला केले आहे.

Protected Content